Pankaja Munde – पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय संवर्धन व शाश्वत विकासाच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये इंद्रायणी व पवना नद्यांची प्रत्यक्ष पाहणी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पाउले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नदी पाहणीदरम्यान सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाणे, घनकचऱ्याची समस्या, तसेच नदीकाठ संवर्धनाची आवश्यकता यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आणि पर्यावरणपूरक विकासासाठी अनेक ठोस उपाययोजना सुचविल्या. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, नाल्यांचे इंटरसेप्शन व डायव्हर्जन, नदीकाठ संवर्धन, पीएमआरडीए मुख्यालयात विकास प्रकल्पांचा आढावा घेताना पंकजा मुंडे आणि अधिकारी. घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे यांचा समावेश होता. यानंतर पीएमआरडीएच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पर्यावरणीय संतुलन राखत विकासकामांना गती देण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. यावेळी महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते. “इंद्रायणी आणि पवना या नद्या शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या नद्यांचे प्रदूषणमुक्तीकरण हे शहराच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडला पर्यावरणपूरक आणि जलस्वयंपूर्ण शहर बनविण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.” – रवि लांडगे, महापौर.