पिंपरी | येलवाडी हद्दीतील अवैध धंदे बंद करा

देहूगाव, (वार्ताहर)- श्री संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी माता यांची कर्मभूमी व क दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या येलवाडी गावच्या हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू असून हे धंदे तातडीने बंद करावेत, यासाठी संबंधित विभागांशी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केलेला आहे; मात्र संबंधित विभागांनी गेल्या सहा सात महिन्यांत कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचायतीने या बाबत 10 जून 2024 रोजी येलवाडी हे तीर्थक्षेत्र असल्याने या भागातील दारू, मटका, जुगार, हातभट्टी दारू विक्री असे व्यवसाय सुरू आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, परिमंडल 3चे पोलीस उपायुक्त, जिल्हाधिकारी व म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रत्यक्ष व मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यपाल, पालकमंत्री यांच्यासह अनेकांना पत्र पाठविण्यात आली आहेत.
यापूर्वी ग्रामपंचायतीने 23 नोव्हेंबर 2023 रोजी मासिक सभेत ठराव मांडला होता व तो मंजूरही झाला होता. या शिवाय या ठरावाला गावातील महिला, ग्रामस्थांसह येथील भागीरथी माती देवस्थान संस्थान यांचा ही पाठिंबा दिला आहे.
तसा ठराव ही स्थानिक पोलीस प्रशासनासह, पोलीस आयुक्त, उपायुक्त व जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकार यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला होता; मात्र अद्यापपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक जी. एस. गिरनार यांनी सरपंच रणजित गाडे यांच्या नावे दिलेल्या पत्रात असे म्हणले आहे की, आपण केलेल्या पत्राच्या अनुषंगाने येलवाडी गावच्या हद्दीत जाऊन पाहणी केली असता असा कोणताही प्रकार आढळून आलेला नाही.
यामुळे याबाबत ग्रामसभेचा ठराव मंजूर केलेला असतानाही पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांनी सरपंच गाडे यांना दिलेल्या समजपत्रात ठराव असा उल्लेख न करता लेखी अर्ज असा उल्लेख करून या भागात असे काहीही आढळून आले नसल्याचे सांगत दिशाभूल केली आहे.
असे 10 जून 2024 च्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस उपायुक्त, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायांना नक्की कोण पाठबळ देत असून खतपाणी घालत आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





