पुणे | बोगसगिरी थांबवा, गुणवंतांवर अन्याय

पुणे, [प्रभात वृत्तसेवा] – पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे बोगस प्रमाणपत्रांचा विषय पुन्हा प्रकाशक्षोतात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस प्रमाणपत्र काढलेल्या उमेदवारांबाबत कडक धोरण तयार करुन कारवाई करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
पूजा खेडकर यांनी बोगस अंपगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याचप्रमाणे खेडकर यांनी वडील क्लास-वन अधिकारी असतानाही ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नाॅन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकारावरुन खोटे प्रमाणपत्राचा आधार घेऊन अधिकारी होण्याचा प्रकार समोर येत आहे.
यापूर्वी मागील काही प्रकरणात बोगस प्रमाणपत्र काढून नोकरी घेतलेल्या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा एमपीएससीने अशा उमेदवारांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दिव्यांग, खेळाडू, अनाथ या प्रवर्गातून बोगस प्रमाणपत्र काढण्याचे प्रमाण वर्षांत वाढले आहे. त्यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गुणवंत उमेदवारांवर अन्याय होत आहे. ते उमेदवार अधिकारी होण्यापासून वंचितत राहत आहेत. या प्रवर्गातील उमेदवार मुख्य प्रवाहात येण्याची संधी डावलली जात आहे.
खासकरुन दिव्यांग व खेळाडू यातून बोगस प्रमाणपत्र काढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकरण गंभीर असून, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट्स राईट्स असाेसिएशनचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी केली आहे.





