औरंगाबाद : राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर पुंडलिकनगर येथील त्यांच्या कार्यालयासमोर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास दगडफेक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून, पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या एका मनोरुग्ण तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, अतुल सावे हे आपल्या पुंडलिकनगर येथील कार्यालयात उपस्थित असताना त्यांची गाडी कार्यालयासमोर उभी होती. यावेळी एका तरुणाने अचानक गाडीच्या समोरील भागावर दगड फेकला. दगडफेकीमुळे गाडीच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. अतुल सावे यांच्या ड्रायव्हरने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अतुल सावे हे कार्यालयातून बाहेर निघण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, याप्रकरणी अतुल सावे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे.