वाराणसीत 50 हून अधिक मुस्लिम मोहल्ल्यांची नावं बदलण्याची तयारी; औरंगाबाद होणार परशुराम चौक

लखनौ – औरंगजेबावरून देशभरात वाद सुरू असतानाच वाराणसी महानगरपालिकेत मोठी तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी वाराणसी महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून मुस्लिम नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोहल्ल्यांची नावं बदलून हिंदू धर्माशी संबंधित नावं ठेवण्याची मागणी केली आहे. आज होणाऱ्या महानगरपालिकेच्या कार्यकारिणी बैठकीत यावर चर्चा होणार असून, पार्षदांच्या मागणीला मान्यताही मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक हिंदूवादी संघटना आणि तुळशी पीठाधीश्वर जगद्गुरू रामभद्राचार्य यांनीही काशीतील मुस्लिम मोहल्ल्यांची नावं बदलण्याची मागणी केली होती.
कार्यकारिणी बैठकीत होणार चर्चा –
महानगरपालिकेच्या आजच्या कार्यकारिणी बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यातच मोहल्ल्यांची नावं बदलण्याचा मुद्दाही समाविष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिंदू क्रमांक 5 च्या 8 व्या स्तंभात वाराणसी शहरातील मोहल्ल्यांचं नामकरण बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
रामभद्राचार्य यांची पीएम मोदींना सूचना –
24 मार्च रोजी काशी हिंदू विश्वविद्यालयातील एका कार्यक्रमात रामभद्राचार्य यांनी नामांतराला पाठिंबा दिला होता. काशीतील अनेक मोहल्ल्यांची नावं मुघल आक्रमकांच्या नावावर असल्याच्या प्रश्नावर त्यांनी म्हटलं होतं, “जिथे जिथे अशी नावं आहेत, ती सगळी बदलावी लागतील.” यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत, याबाबत त्यांच्याशी नक्कीच बोलणार असल्याचं म्हटलं होतं.
पौराणिक आधारावर नवीन नावं –
या कामासाठी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातील विद्वानांना नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांना पौराणिक मान्यतांच्या आधारावर मोहल्ल्यांसाठी नवीन नावांचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या मोहल्ल्यात जे पौराणिक देवी-देवता आहेत, त्यांच्याच नावावर त्या मोहल्ल्याचं नामकरण केलं जाणार आहे. या मसुद्यानुसार, खालिसपुरचं नाव ब्रह्मतीर्थ, मदनपुराचं नाव पुष्पदंतेश्वर आणि औरंगाबादचं नाव परशुराम चौक असं प्रस्तावित आहे.
नामांतरानंतरच्या अडचणी –
नावं बदलल्यानंतर अनेक अडचणी उद्भवतात. ज्या मोहल्ल्यांचं नाव बदललं जातं, तिथल्या लोकांचे सर्व रेकॉर्डही बदलावे लागतात, ही मोठी आव्हानात्मक प्रक्रिया आहे. शिवाय, रेल्वे आणि टपाल विभागालाही याची माहिती द्यावी लागते. या रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेकदा काही महिने लागतात, ज्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

