शेवगावात दगडफेक अन् जाळपोळ; तणावपूर्ण शांतता

शेवगाव – छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्ताने रविवारी निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीनंतर शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शेवगाव शहरात तणावपूर्ण शांतता असून या दगडफेकीत तीन पोलीस व चार गृह रक्षकदलाचे कर्मचारी असे सात जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्रीपासून पोलिसांनी दडगफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली होती.शेवगाव पोलिसांनी 112 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 31 जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राखीव दलाच्या तुकड्यासह सुमारे 200 पोलिसाचा मोठा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.
यावेळी रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारात झालेल्या दगडफेकीत शिवाजी चौकातील अनेक व्यावसायिकाच्या पाट्या, काचेची तावदाने फोडण्यात आली. तसेच रस्त्यावरील उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दुचाक्या जाळण्यात आल्या. या नुकसानीतून रुग्णवाहिकाही सुटली नाही.जैन गल्लीतील काही रहात्या घराच्या खिडक्यांची तावदाने फोडण्यात आली. त्यामुळे रविवारी रात्री उशीरापर्यंत शहरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. पाथर्डी, नेवासा येथील अतिरिक्त कुमक दाखल होईपर्यंत शेवगाव पोलिसांनी खिंड लढवली. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने निघालेली मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दाखल झाल्यावर हा प्रकार घडला आहे. अहमदनगरहून शेवगावला मोठा बंदोबस्त पाठविण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.
या घटनेनंतर तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरात दाखल होऊन परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील हे शेवगावात तळ ठोकून आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी दंगलग्रस्त भागात फिरुन शहरवासीयांना शंतातेचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी महेश सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 112 संशयीत आरोपी निष्पन्न केले असून 100 ते 150 अनोळखी इसमाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 112 पैकी 31 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील 2 जण अल्पवयीन असल्याने त्यांना सोडुन देण्यात आले. उर्वरित 29 जणांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
यावेळी झालेल्या दगडफेकीत पो.कॉ महेश सावंत, पोहेकॉ पांडुरंग वीर, पो.ना रामेश्वर वसंत घुगे, होमगार्ड नवनाथ कराळे, सतिष विष्णु तांदळे, मयुर विश्वासराव म्हस्के, आरीफ बहादूरखान पठाण याव्यतिरिक्त अनेक ग्रामस्थ जखमी झाले असून भितीपोटी परस्पर औषधोपचार घेत असून समोर आले नाहीत. तर 29 जणांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी
इमरान दिलावर पठाण (वय 22 रा. नाईकवाडी मोहल्ला), इसान मुस्तफा पठाण (वय 27 रा.नाईकवाडी मोहल्ला), रिजवान आयुब (रा. वडारगल्ली), मुस्तफा मन्सुर खान पठाण (वय 48 रा. नाईकवाडी मोहल्ला), इस्तीयाज ईस्माईल शेख (वय 31 रा. नाईकवाडी मोहल्ला),नईम इलीयास सय्यद (वय 34 रा. नाईकवाडी मोहल्ला), मुस्तफा शेख (वय 26 रा. भगुर ता. शेवगाव), सल्लाउद्दीन हशमोद्दीन शेख (वय 28 रा. नाईकवाडी मोहल्ला), वसिम अल्ताफ शेख (वय 31 रा. नाईकवाडी मोहल्ला), यासीर इस्माईल शेख (वय 28 रा. गेवराई रोड), मतीन युसुफ शेख (वय 42 रा. नाईकवाडी मोहल्ला), शब्बीर युसुफ जहॉंगीरदार (वय 34 रा. नाईकवाडी मोहल्ला), जावेद चॉंद शेख (वय 29 रा. गेवराई रोड), अर्शद अहमद शेख (वय 20 रा. सोनमिय वस्ती), प्यारेलाल दस्तगीर शेख (वय 59 रा. विद्यानगर), सलीम फैय्याज शेख (वय 28 रा. नाईकवाडी मोहल्ला), फिरदोस फारूक पठाण (वय 25 रा. नाईकवाडी मोहल्ला), शमशोटीन कदीर सय्यद (वय 34 रा.शास्त्रीनगर शेवगाव), नदीन जाफर शेख (वय 27 रा. नाईकवाडी मोहल्ला), रज्जाक कदीर सय्यद (वय 19 रा. शास्त्रीनगर), हुसेन रहीम बेग (वय 30 रा. इंदिरानगर), आरिज नजीर पठाण (वय 29 रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव), बंड मधुकर वाबळे (वय 32 रा. वाबळे वस्ती पेठण रोड), राहुल नवनाथ कुसळकर (वय 31 रा. नाईकवाडी मोहल्ला), सोमनाथ सतिष मोहिते (वय 28), बापुसाहेब चंद्रकांत वाघ (वय 25 रा. इंदिरानगर शेवगाव), बाबासाहेब दाद वाघमारे (वय 39 रा. इंदिरानगर शेवगाव), रोहित अशोक सुमारे (वय 19 वर्ष रा. वडारगल्ली शेवगाव), कैलास भाऊराव तिजोरे (वय 46 रा.पैठण रोड शेवगाव).
20 वाहनांसह 15 दुकानांचे नुकसान
दंगलीमध्ये 12 दुचाकी, 8 चारचाकी तसेच सुमारे पंधरा दुकानाचे नुकसान झाले. तर चार – पाच नागरिक जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंकुश पातकळ यांनी दिलेल्या फिर्यादनुसार 25 ते 30 अनोळखी इसमाच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आज उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पोटावर वार करण्यात आला असून नगर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.





