शिरूर पोलिसांची कमाल ! चोरीची मोटारसायकल परजिल्ह्यातून जप्त, सराईत चोरटा गजाआड

शिरूर : शिरूर शहरातील मार्केटयार्ड परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत परजिल्ह्यातून हस्तगत करत शिरूर पोलिसांनी दाखवलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या शिताफीच्या कारवाईत सराईत चोरटा बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. व जि. अहमदनगर) याला नागपूर एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MH13 BG 6927) जप्त करण्यात आली आहे.
२८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीने आपली होंडा शाईन मोटारसायकल मार्केटयार्ड परिसरातील मोकळ्या जागेत हँडल लॉक करून पार्क केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३६६/२०२५, भा.द.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
असा केला पोलिसांनी तपास ?
मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपीचा माग काढला. तपासात बापू थोरात हा सराईत चोरटा असल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर येथे मोटारसायकल चोरीचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपीकडून काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल (व्हेहीकल क्र. ME4JC36JJC7184343, इंजिन क्र. JC36E7280444) जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी तत्परता आणि तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट वापर केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड आणि अजय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी खेडकर करत आहेत.
जनतेचा विश्वास वाढला
शिरूर पोलिसांच्या या तत्पर आणि संयमित तपासकार्यामुळे जनतेचा पोलीस खात्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही कारवाई सराईत गुन्हेगारांना चेतावणी देणारी आहे की, गुन्हा करून पळून जाणे आता अशक्य आहे.





