Stock Market: अमेरिका -इराण युद्ध समाप्त होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार निर्देशांकांची घोडदौड शुक्रवारी चालू राहिली. यामुळे निर्देशांक लवकरात विक्रमी पातळीकडे आगेकूच करू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 504 अंकानी वाढून 78,493 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 156 अंकांनी म्हणजे 0.65 टक्क्यांनी वाढून 24,353 अंकावर बंद झाला. आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 943 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी तर निफ्टी 302 अंकांनी म्हणजे 1.25 टक्क्यांनी वाढला आहे. खनिज तेलाचे दर एक आठवड्यापासून शंभर डॉलरच्या खाली आहेत. ही भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बाब आहे. अशा परिस्थितीत स्मॉल कॅप, मिडकॅप क्षेत्राबरोबरच एफएमसीजी, भांडवली वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू, इंडस्ट्रियल्स इत्यादी क्षेत्राचे निर्देशांक वाढले होते. जागतिक बाजारातही सकारात्मक वातावरण आहे. हेही वाचा – इराणचा मोठा निर्णय! व्यापारी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी केली ‘पूर्णपणे खुली’ अशा परिस्थितीत भारतीय संस्थागत गुंतवणूकदार व किरकोळ गुंतवणूकदार सध्याच्या परिस्थितीत खरेदी करीत आहेत. विशेष म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री थांबविली असून या गुंतवणूकदारांनी गुरुवारी 382 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. जर युद्ध थांबले आणि रुपयाचे मूल्य वाढले तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आगामी काळात बरीच गुंतवणूक करण्याची शक्यता वाढली आहे. कारण पुढील महिन्यात भारत – ब्रिटन व्यापार कराराची अंमलबजावणी होणार आहे. त्याचबरोबर भारत -अमेरिका करार या महिन्याच्या अखेरीस होऊ शकतो.