Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केल्याने जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजारातही खळबळ पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात तेजीने व्यवहार सुरू झाल्यानंतर दुपारच्या सत्रात बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला. यामुळे सेन्सेक्स एका टप्प्यावर तब्बल ९९५ अंकांनी कोसळला होता, तर निफ्टीने २५,६०० च्या पातळीपर्यंत गटांगळी खाल्ली. दिवसभराच्या या प्रचंड चढ-उतारानंतर सेन्सेक्स २५०.४८ अंकांच्या घसरणीसह ८३,६२७.६९ वर, तर निफ्टी ५७.९५ अंकांनी घसरून २५,७३२.३० वर स्थिरावला. बाजार घसरल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज घट झाली आहे. सोमवारी बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४.६८ लाख कोटींच्या आसपास होते, जे आज व्यवहार बंद होताना ९३,४६७ कोटी रुपयांनी घटून ४.६७ लाख कोटींवर आले. विशेष म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त १५ जानेवारीला बाजार बंद राहणार असल्याने सेन्सेक्सची साप्ताहिक एक्स्पायरी उद्या, बुधवारी १४ जानेवारीला होणार आहे. यासोबतच आज निफ्टीचीही साप्ताहिक एक्स्पायरी असल्याने बाजारात दुहेरी अस्थिरता पाहायला मिळाली. या घसरणीमागे केवळ अमेरिकेची धोरणेच कारणीभूत नाहीत, तर स्थानिक घटकांनीही नकारात्मक भूमिका बजावली. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या टीसीएस आणि एचसीएल टेकच्या नफ्यात झालेली मोठी घट गुंतवणूकदारांच्या जिव्हारी लागली आहे. टीसीएसचा नफा १३.९१ टक्क्यांनी तर एचसीएल टेकचा नफा ११.२ टक्क्यांनी घसरल्याने आयटी समभागांमध्ये मोठी विक्री झाली. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ९०.२२ पर्यंत घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग सहाव्या दिवशी आपली विक्री सुरूच ठेवली असून काल त्यांनी ३,६३८ कोटी रुपयांचे समभाग विकले. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टीसाठी सध्या २५,९०० ची पातळी हा मोठा अडथळा असून, जर बाजार २५,७७५ च्या वर टिकला नाही, तर तो २५,६२० पर्यंत खाली जाऊ शकतो. आज सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १० शेअर्स हिरव्या निशाण्यावर बंद झाले, ज्यात आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा आघाडीवर होते, तर ट्रेंट आणि एल अँड टी सारख्या मोठ्या कंपन्यांना घसरणीचा सामना करावा लागला.