Stock Market: आयटीसी कंपनीच्या शेअरचा भाव वाढला तब्बल 48 टक्क्यांनी

मुंबई – शहरातून आणि खेड्यातून ग्राहक वस्तूंची मागणी आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ग्राहक वस्तू निर्माण करणाऱ्या आयटीसी कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे आता या कंपनीचे बाजार मूल्य 6 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
बाजारमुल्य 6 लाख कोटींपेक्षा जास्त असणारी आयटीसी ही भारतातील सातवी कंपनी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एसडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस या कंपन्या या अगोदरच सहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार मूल्याच्या ठरल्या आहेत.
यावर्षी आयटीसी कंपनीच्या शेअरचा भाव आतापर्यंत तब्बल 48 टक्क्यांनी वाढला आहे. यावरून या कंपनीच्या शेअरचे आकर्षणमूल्य किती आहे याचा अंदाज येतो. या कंपनीची रोख आवक दमदार आहे. त्याचबरोबर कंपनी नियमितपणे लाभांश देते. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये आयटीसी कंपनीचा समावेश करतात.
गुरुवारी या कंपनीच्या शेअरचा भाव 3 टक्क्यांनी वाढून 492 रुपये प्रति शेअर हा पातळीवर गेला होता. ही कंपनी ग्राहक वस्तू, सिगरेट, कागद, हॉटेल इत्यादी क्षेत्रात काम करते. या कंपनीच्या शेअरच्या भावात अनेक वर्षापासून निरंतर वाढ होत असल्याचे दिसून येते.
मात्र आयटीसी कंपनीच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या श्रंखलेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक लागते. त्याचबरोबर या भांडवलाचा कमाल वापर अनेकदा कमी प्रमाणात होतो. यातून मार्ग काढण्यासाठी आयटीसी कंपनी उच्च पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. आगामी काळातही या कंपनीच्या शेअरच्या भावात कमी अधिक प्रमाणात वाढ होत राहण्याची शक्यता बऱ्याच ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केली आहे.




