Stock Market: शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹41,000 कोटींची भर

Stock Market: जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि ऊर्जा क्षेत्रातील खरेदीमुळे भारतीय शेअर बाजाराने आज सलग चौथ्या दिवशी तेजी कायम ठेवली. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा वेग मंदावल्यानेही बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. व्यवहाराच्या अखेरीस, सेन्सेक्स 136.63 अंकी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वधारून 81,926.75 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 30.65 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 25,108.30 अंकांवर स्थिरावला. बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.4 टक्क्यांची वाढ झाली, मात्र स्मॉलकॅप निर्देशांकात किरकोळ घसरण झाली.
क्षेत्रनिहाय स्थिती –
ऑईल अँड गॅस, वित्तीय सेवा, बँकिंग, कंस्ट्रक्शन आणि कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांची खरेदी वाढल्याने या सेक्टरमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे, मीडिया आणि कंझ्युमर गुड्स क्षेत्रातील काही निवडक शेअर्समध्ये घसरण झाल्याने हे विभाग आज कमकुवत ठरले.
गुंतवणूकदारांची संपत्ती ₹41,000 कोटींनी वाढली –
बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 460.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे सोमवारी 459.84 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ₹41,000 कोटींची वाढ झाली आहे.
सर्वाधिक वाढलेले सेन्सेक्स शेअर्स –
सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्स वाढीसह बंद झाले. भारती एअरटेलचा शेअर 1.55 टक्क्यांनी वधारत अव्वल ठरला. त्यानंतर एचसीएल टेक (1.40%), अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड आणि एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये 0.88 टक्क्यांपासून ते 1.40 टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदली गेली.
सर्वाधिक घसरलेले शेअर्स –
तर एक्सिस बँकचा शेअर 2.13 टक्क्यांनी घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, ट्रेंट, इन्फोसिस आणि एसबीआय या शेअर्समध्ये 1.07 ते 2.01 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
एकूण व्यवहार स्थिती –
आज बीएसईवर एकूण 4,322 शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी 1,847 शेअर्स वाढीसह, तर 2,316 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 159 शेअर्स सपाट बंद झाले. याशिवाय 175 शेअर्सनी आज व्यवहारादरम्यान 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 130 शेअर्सनी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला.
(सूचना: येथे दिलेली माहिती केवळ माहितीपर आहे. शेअर बाजारात गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)




