दिवाळीतील ‘मुहूर्त’ व्यवहारात शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला

मुंबई – दिवाळीत झालेल्या विशेष एक तासाच्या व्यवहारात शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले. त्यामुळे नव्या संवत्सर वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली आहे. निर्देशांक 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध होते.
मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 62 अंकांनी वाढून 84,426 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 25 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी वाढून 25,868 अंकावर बंद झाला. 25 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर उरलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
दरम्यान गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत सेन्सेक्स 4,974 अंकांनी म्हणजे 6.26 टक्क्यांनी तर निफ्टी 6.76 टक्क्यांनी वाढला आहे. आज बजाज फिन्सर्व 1.42 टक्क्यांनी वाढला. अॅक्सिस बँक, इन्फोसिस, महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, एअरटेल, मारुती, ट्रेन्ट, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतात खरेदी चालूच आहे. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 790 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सोमवारी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारानी 2,485 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली.
विश्लेषकांनी सांगितले की, भारत- अमेरिकेदरम्यान व्यापार चर्चा सकारात्मक पातळीवर चालू आहे. इस्त्रायल- हमास युद्ध संपले आहे. त्याचबरोबर रशिया -युक्रेन युद्ध समाप्त होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतातील गुंतवणूक विषयक वातावरण सकारात्मक होईल असे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना वाटत आहे.
जागतिक बाजारात आज सकारात्मक वातावरण होते. काल अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. आज जपान, दक्षिण कोरिया, शांघाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी वाढले होते. युरोपियन बाजारातूनही सकारात्मक संदेश आले. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी करणे पसंत केले.




