Stock Market : दोन दिवसानंतर शेअर निर्देशांकात घट, डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाच्या धमकीचा परिणाम…

मुंबई – भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून कमालीचे उमेदीचे वातावरण होते. मात्र लवकरच अमेरीकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी बर्याच देशाविरुद्ध व्यापार युद्धाची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्याचा संसर्ग भारतीय शेअर बाजारांनाही झाला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 105 अंकांनी कमी होण्याची 80,004 अंकावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 अंकांनी म्हणजे 0.11 टक्क्यांनी कमी होऊन 24, 194 अंकावर बंद झाला. अदानी समूहातील कंपन्यात टोटल गॅस या फ्रान्सच्या कंपनीने गुंतवणुकीला स्थगिती दिल्यामुळे आणि या समूहाबाबत पतमानांकन संस्थांनी नकारात्मक वक्तव्य केल्यामुळे या समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एनटीपीसी, टाटा मोटर्स, महिंद्रा, लार्सन अँड ट्यूबरो, पावर ग्रीड या कंपन्या पिछाडीवर होत्या. एशियन पेंट्स, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
अमेरिका वगळता इतर बहुतांश देशाच्या शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. मिडकॅप 0.10 टक्क्यांनी, स्मॉल कॅप 0.62 टक्क्यांनी, ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 1.55 टक्क्यांनी, वाहन क्षेत्राचा निर्देशांक 1.26 टक्क्यांनी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक एक टक्क्याने आणि सेवा क्षेत्राचा निर्देशांक 0.64 टक्क्यांनी कमी झाला. मात्र धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक वाढले.
China–US Trade War : चीनमधून अमेरिकेत होणार्या आयातीवर 35 टक्के आयात शुल्क लावणार – डोनाल्ड ट्रम्प
परकीय गुंतवणूकदारांकडून खरेदी
दरम्यान बर्याच दिवसापासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात एकतर्फी विक्री करीत होते. सोमवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 9,947 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र या गुंतवणूकदारांचे पुढील निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय आणि व्यापारी धोरणावर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चीन विरोधात ट्रम्प यांनी भूमिका घेतल्यामुळे काही प्रमाणात ही गुंतवणूक भारताला उपलब्ध होऊ शकेल.




