Stock Market : शेअर बाजाराची सलग चौथ्या दिवशी दमदार घोडदौड; सेन्सेक्स 1225 अंकांनी वधारला
Stock Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स १,२२५ अंकांनी वाढून ७६,९१७.८५ वर, तर निफ्टी २३,८१०.८५ वर बंद झाला.

Stock Market : देशातील शेअर बाजारातील तेजी मंगळवारी सलग चौथ्या दिवशी कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास २ टक्क्यांनी वाढून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून पुन्हा सुरू झालेली खरेदी यामुळे बाजाराला आधार मिळाला.
३० कंपन्यांचा सेन्सेक्स १,२२५.०७ अंकांनी म्हणजेच १.६२ टक्क्यांनी वाढून ७६,९१७.८५ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ३७०.०५ अंकांनी म्हणजेच १.५८ टक्क्यांनी वाढून २३,८१०.८५ अंकांवर पोहोचला.
सेन्सेक्समधील हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. मात्र पॉवर ग्रिड, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील आणि ट्रेंट यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
दरम्यान, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ३,११४.६८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. गेल्या चार दिवसांत सेन्सेक्समध्ये ३,६७१.८२ अंकांची म्हणजेच ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. निफ्टीही १,११२ अंकांनी म्हणजे ४.८९ टक्क्यांनी वधारला आहे.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण, अमेरिकेतील रोखे परताव्यातील घट आणि परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी यामुळे बाजारातील दबाव कमी झाला आहे. कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील चांगल्या निकालांमुळेही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
दरम्यान, ब्रेंट कच्च्या तेलाचा दर ०.७२ टक्क्यांनी वाढून १०५.६ डॉलर प्रति बॅरल झाला. आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि शांघाय निर्देशांक घसरले, तर हाँगकाँगचा हँगसेंग वाढला. युरोपीय बाजारात मात्र घसरण दिसून आली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹3.99 लाख कोटींची वाढ –
एका कामकाजाच्या दिवसापूर्वी, म्हणजेच 2 नोव्हेंबर 2026 रोजी BSE वर नोंदणीकृत सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ₹4,82,74,651.52 कोटी होते. आज, म्हणजेच 3 नोव्हेंबर 2026 रोजी यामध्ये वाढ होऊन ते ₹4,86,74,306.36 कोटींवर पोहोचले. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹399,654.84 कोटींची भर पडली आहे.





