शेअर बाजाराची वाईट सुरुवात; ‘या’ कराणामुळे सेंसेक्स १३९० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले

मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २ एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या करांमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (१ एप्रिल) मोठी विक्री झाली. त्यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. कोविड प्रभावित २०२०-२१ नंतर वित्त वर्षाच्या पहिल्या दिवसाची ही सर्वात खराब सुरुवात आहे. बीएसई सेंसेक्स ५०० अंकांनी घसरून ७६,८८२.५८ वर उघडला आणि दिवसभरात ७५,९१२.१८ पर्यंत खाली गेला. शेवटी १३९०.४१ अंकांच्या (१.८०%) घसरणीसह ७६,०२४.५१ वर बंद झाला. निफ्टी-५० देखील ३५३.६५ अंकांनी (१.५०%) खाली येऊन २३,१६५.७० वर थांबला.
कोणते शेअर पडले, कोणते चढले?
सेंसेक्समधील ३० पैकी २४ कंपन्यांचे शेअर घसरले. बजाज फिनसर्व्ह सर्वात जास्त खाली आले. इन्फोसिस, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक, टीसीएस आणि सन फार्मा यांनाही फटका बसला. दुसरीकडे, इंडसइंड बँक ५% वर चढली, तर जोमॅटो, नेस्ले इंडिया, आयटीसी, भारती एअरटेल आणि पॉवर ग्रिड हे शेअर वाढले.
गुंतवणूकदारांचे नुकसान
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ४,१०,७६५ कोटी रुपये बुडाले. बीएसई कंपन्यांचे बाजार मूल्य ४,०९,६४,८२१ कोटी रुपयांवर आले, जे शुक्रवारी ४१,३७५,५८६.२० कोटी रुपये होते.
यापूर्वी काय झाले?
१ एप्रिल २०२० रोजी सेंसेक्स १,२०३ अंकांनी (४.१%) घसरून २८,२६५ वर आणि निफ्टी ३०० अंकांनी (३.९%) खाली ८,२६३ वर बंद झाला होता. २०२१ मध्ये सेंसेक्स ५२०.६८ अंकांनी वाढून ५०,०२९.८३ वर, तर २०२२ मध्ये ७०८.१८ अंकांनी चढून ५९,२७६.६९ वर गेला होता.
घसरणीची कारणे
१) ट्रम्प यांच्या करांमुळे जागतिक बाजारात भीती, २) मार्चमधील तेजीनंतर नफावसुली, ३) परदेशी गुंतवणूकदारांनी ४,३५२ कोटींची विक्री, ४) आशियाई आणि अमेरिकी बाजारात चढउतार.
ट्रम्प यांचा निर्णय
ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून सर्व देशांवर समान कर लावणार असल्याचे सांगितले. कोणालाही सूट नाही, असे त्यांनी रविवारी एअरफोर्स वनमध्ये पत्रकारांना स्पष्ट केले. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेत हा निर्णय आल्याने चिंता वाढली आहे.





