Stock Market: युद्धविरामाच्या आशेने बाजारात उसळी; सेन्सेक्स 787 अंकांनी वाढला, निफ्टी 22,968 वर बंद
Stock Market:

Stock Market: आखातातील युद्ध थांबविण्यासाठी पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेसमोर प्रस्ताव ठेवला आहे. याची सकारात्मक निष्पत्ती होण्याची शक्यता ज्या गुंतवणूकदारांना वाटते त्यांनी दुपारच्या सत्रात जोरदार खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने वाढण्यास मदत झाली. दरम्यानच्या काळात रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 787 अंकांनी म्हणजे 1.07 टक्क्यांनी वाढून 74,106 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 255 अंकांनी वाढून 22,968 अंकावर बंद झाला. 3,207 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 1,147 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
युद्ध समाप्तीच्या शक्यतेनंतर लगेच खनिज तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर आता खरेदी केल्यानंतर लवकर जास्त फायदा होईल असे वाटल्याने बर्याच गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवली.
हेही वाचा – Bank Nifty: बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी; बँक निफ्टी 1,060 अंकांनी उसळला
ट्रेन्ट कंपनीच्या शेअरचा भाव आठ टक्क्यांनी वाढला. अॅक्सिस बँक, टायटन, लार्सन अॅण्ड ट्यूब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदणी गेली. तेल आणि नैसर्गिक वायू वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले.
आजच्या खरेदीचा सर्वात जास्त फायदा ग्राहक वस्तू क्षेत्राला झाला. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअरही वधारले. खनिज तेलाचे दर कमी झाल्यानंतर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला लगेच तात्काळ आधार मिळू शकतो असे समजले जात आहे. दरम्यान रुपयाचे मूल्य अजूनही कमी पातळीवर असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 9,931 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 7,208 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
क्षेत्र वाढ –
सरकारी बँका 2.27%
ग्राहक वस्तू 2.31%
खासगी बँका 2.15%
वित्तीय सेवा 2.12%
बँकेक्स 2.03%
युटिलिटीज 1.94%




