Stock Market: मेटल-ऑटो समभागांच्या तेजीने शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स 568 अंकांनी वधारला, निफ्टी 23,581 वर बंद
Stock Market: गेल्या दोन व्यवहार सत्रांत सेन्सेक्स १,५०० अंकांहून अधिक म्हणजेच सुमारे २ टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टी ५० मध्येही ४३० अंकांची म्हणजेच सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली. केवळ दोन सत्रांत गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांहून अधिकचा फायदा झाला.

Stock Market: मध्य पूर्वेतील संकट कायम असतानाही मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदवली. ऑटो आणि मेटल समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्याने बाजाराला मोठा आधार मिळाला. आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि एल अँड टी यांच्यातील खरेदीनेही बाजार वर खेचण्यास मदत केली.
सेन्सेक्स-निफ्टीची कामगिरी
बीएसई सेन्सेक्स ७५,८२६ अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो ७६,३०४ अंकांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला आणि अखेर ५६७.९९ अंक म्हणजेच ०.७५ टक्क्यांच्या वाढीसह ७६,०७०.८४ अंकांवर बंद झाला. एनएसई निफ्टी-५० २३,४९३ अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो २३,६५६ अंकांच्या उच्चांकापर्यंत गेला तर २३,३४६ अंकांपर्यंत खाली आला. अखेर १७२.३५ अंक म्हणजेच ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह २३,५८१ अंकांवर बंद झाला.
तज्ज्ञांचे विश्लेषण –
सेबी नोंदणीकृत संशोधन विश्लेषक आणि लिव्हलाँग वेल्थचे संस्थापक हरिप्रसाद के. यांनी सांगितले की, “निफ्टी ५० आज वाढीसह उघडला आणि वरच राहिला. त्यामुळे २३,००० चा स्तर आता एक मजबूत आधार बनला आहे. सध्या निफ्टी २३,६०० जवळ पोहोचत असून या पातळीवर पूर्वीही विक्रीचा दबाव होता. त्यामुळे बाजार वर जाताना विकण्याचा कल अजूनही कायम आहे.”
ते पुढे म्हणाले, “निफ्टी २३,६०० च्या वर मजबूतपणे गेल्यास तो २३,८०० ते २४,००० पर्यंत जाऊ शकतो. मात्र हा टप्पाही जोरदार प्रतिकाराचा असू शकतो. खाली आल्यास २३,३००-२३,३५० दरम्यान चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.” आरएसआय सुमारे ३४ पर्यंत पोहोचला असून सीसीआय सुधारत असल्याने खालच्या पातळीवर हळूहळू खरेदी सुरू झाल्याचे संकेत मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोण वधारले, कोण घसरले?
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इटरनल सर्वाधिक म्हणजे सुमारे ५.५ टक्क्यांनी वधारले. टाटा स्टील ४ टक्क्यांहून अधिक चढला. महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एल अँड टी, भारती एअरटेल, इंडिगो, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स आणि अॅक्सिस बँक हे प्रमुख फायद्यात राहिले.
दुसरीकडे इन्फोसिस, आयटीसी, बजाज फायनान्स, टीसीएस, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एसबीआय घसरणीत राहिले.
सेक्टरनिहाय कामगिरी –
निफ्टी मेटल सर्वाधिक २.८ टक्क्यांनी वधारला. निफ्टी ऑटो २.१ टक्के आणि निफ्टी रिअल्टी १.८ टक्क्यांनी चढला. व्यापक बाजारातही निफ्टी मिडकॅप १०० मध्ये १.०२ टक्के तर स्मॉलकॅपमध्ये ०.६५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मात्र निफ्टी एफएमसीजी आणि आयटी निर्देशांकात घसरण झाली.
दोन दिवसांत गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फायदा –
गेल्या दोन व्यवहार सत्रांत सेन्सेक्स १,५०० अंकांहून अधिक म्हणजेच सुमारे २ टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टी ५० मध्येही ४३० अंकांची म्हणजेच सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली. केवळ दोन सत्रांत गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांहून अधिकचा फायदा झाला. बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४३० लाख कोटी रुपयांवरून ४३३ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.




