Stock Market : आयटी,वाहन कंपन्यांच्या शेअरच्या विक्रीमुळे निर्देशांक कोसळले; किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान…

मुंबई – गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध कारणावरून भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गुरुवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जागतिक नकारात्मक परिस्थितीमुळे दीड टक्क्यांनी कोसळले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,190 अंकांनी कोसळून 79,043 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 360 अंकांनी म्हणजे 1.49 टक्क्यांनी कमी होऊन 23,914 अंकावर बंद झाला. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 1.50 लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले. शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य आता 442 लाख कोटी रुपये म्हणजे 5.24 लाख कोटी डॉलरवर आले आहे.
अमेरिकेतील महागाई वाढली आहे. त्यामुळे अमेरिका आता व्याजदरात कमी कपात करेल असे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत डॉलर वधाावरून भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच विक्री झाली. वाहन कंपन्यांची विक्री मंदावत असल्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. समाधानाची बाब म्हणजे, अजूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदार काही प्रमाणात खरेदी करीत आहेत. गेल्या तीन दिवसापासून या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदी केली आहे. बुधवारी या गुंतवणूकदाराने कमी म्हणजे आठ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र हे गुंतवणूकदार अजूनही अस्वस्थ आहेत.
Adani Group : अदानींच्या पाच कंपन्यांचे शेअर तेजीत, सर्व काही ठीक असल्याचा युक्तिवाद…
अमेरिकेतील परिस्थिती बदलली
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात काही प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र रशिया- युक्रेन युद्ध चिघळत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारातील वातावरण नकारात्मक झाले. कारण अमेरिका आता व्याजदरात जास्त कपात करू शकणार नाही. अशा अवस्थेत भारतासारख्या देशाकडे कमी परकीय गुंतवणूक येणार आहे. सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 29 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. फक्त स्टेट बँकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.




