Stock Market Today : शेअर बाजार निर्देशांक उसळून नव्या उच्चांकी पातळीवर

मुंबई – तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद कंपन्या लवकरच जाहीर करणार आहेत. हे ताळेबंद नफादायक असतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील राजकीय परिस्थिती आता पूर्णपणे निवळली आहे. त्यामुळे शुक्रवारी जोरदार खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले. ( Stock market index rises to new highs )
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 689 अंकांनी म्हणजे दिड टक्क्यांनी वाढून 48,782 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 209 अंकांनी वाढून 14,347 या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.
शुक्रवारी गुंतवणूकदारांनी इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. मात्र इंडसइंड बॅंक, भारती एअरटेल, स्टेट बॅंक, आयटीसी, एचडीएफसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
रिलायन्स सिक्युरिटीजचे बिनोद मोदी यांनी सांगितले की, एक तर अमेरिकेने मोठे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेली संदिग्धता आता जो बायदेन अध्यक्ष होणार असल्यामुळे दूर झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील लोकप्रतिनिधीगृहाबरोबरच सिनेटमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले आहे.
यावर्षी विकास दर अपेक्षेपेक्षा चांगला राहणार असल्याचे भाकीत काल अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे. अर्थमंत्रालयाने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार विकासदर उणे 7.7 टक्के राहणार आहे. अगोदर यापेक्षा विकासदर कमी होईल अशी भाकिते व्यक्त करण्यात आली होती. शिवाय भारतातील लसीकरण आता सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व मनुष्यबळ अर्थव्यवस्थेसाठी उपलब्ध होणार आहे. या कारणामुळे अर्थव्यवस्थेसाठी आगामी काळात उत्तम असेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिकेतील परिस्थिती सुधारल्यामुळे जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले.
गुंतवणूकदारांकडून फक्त मोठ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी होत नाही तर छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या खरेदी होऊ लागली आहे. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅपही 19,161 या विक्रमी पातळीवर गेला आहे. स्मॉलकॅप वाढून 18,984 अंकावर गेला आहे. सध्या विविध कंपन्यांच्या शेअरचे भाव उच्च पातळीवर असल्यामुळे मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य वाढून 195.21 लाख कोटी रुपये झाले आहे.




