Stock Market| निवडक खरेदीमुळे निर्देशांकात सुधारणा

Stock Market| अमेरिकेत अपेक्षेपेक्षा मंद गतीने महागाई कमी होत असल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यानंतर अमेरिका, युरोप आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. मात्र भारतीय गुंतवणूदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांक वाढण्यास मदत झाली.
आज झालेल्या खरेदीचा फायदा वाहन, वित्त, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांना झाला. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 267 अंकांनी वाढून 71,822 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.45 टक्क्यांनी म्हणजे 96 अंकांनी वाढून 21,840 अंकावर बंद झाला.
बुधवारी धातू, बँका, ग्राहक वस्तू, वाहन आणि आर्टिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची ही बरीच खरेदी झाली, त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला, बाजारातील आजच्या घटनाक्रमाबाबत जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, सकाळी जागतिक बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले होते.
तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री ( Stock Market ) –
मात्र नंतर भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे पाहून बरीच खरेदी झाली. भारतातील सरकारी बँकांच्या सकारात्मक ताळेबंदाकडे लक्ष देऊन बँकांच्या शेअरची खरेदी झाली. मात्र जागतिक बाजारातील नकारात्मक परिस्थितीमुळे गुंतवणूकदार अपेक्षेप्रमाणे सावध होते.
इतर क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली असली तरी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. कारण अमेरिकेतील जास्त महागाईमुळे व्याजदर कपातील उशीर होईल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अमेरिकेतून ऑर्डर मिळण्यास उशीर होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, या आठवड्यात मुख्य निर्देशांकापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिडकॅप आणि स्मॉल कॅप जास्त वेगाने वाढत आहेत. आज मिड कॅप व स्मॉल कॅप अनुक्रमे एक टक्का आणि 1.6 टक्क्याने वाढले. त्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टी केवळ पाव टक्क्यांनी वाढले.




