Stock Market: शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक वाढली

मुंबई – अमेरिकेतील महागाई कमी होऊ लागली आहे. त्यामुळे अमेरिकेत आता जास्त व्याजदर वाढ होणार नाही असे समजले जाऊ लागले आहे. अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढू लागली असून नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी 19 हजार कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे.
ऑक्टोबर महिन्यातही याच कारणामुळे या गुंतवणूकदारांनी भारतात खरेदी वाढविले होती. सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र अमेरिकेत महागाई जास्त असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 724 कोटी रुपये काढून घेतले होते. अमेरिकेतील महागाई खात्रीने कमी होण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळातही हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढवतील असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्ही के विजयकुमार यांनी सांगितले.
वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून दीड लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पुन्हा हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढून सध्या उचांकी पातळीवर आहेत. जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत असताना भारतात मात्र देशातील किरकोळ गुंतवणूकदार आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराचे निर्देशांक जास्त घसरून दिले नव्हते.
आता यात परदेशी गुंतवणूकदाराची भर पडत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था उत्तम आहे. भारतातील महागाई कमी होऊ लागली आहे. भारतातील कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामुळे भारतातून चांगला परतावा मिळेल असे परदेशी गुंतवणूकदारांना वाटणे साहजिक आहे. मात्र दरम्यानच्या काळात रुपया घसरत असल्यामुळे हे गुंतवणूकदार परत जात होते. आता रुपयाचे मूल्य स्थिर होण्याची शक्यता वाढली आहे.
जागतिक बाजारातील परिस्थिती भारतापेक्षा खराब आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारानी आतापर्यंत चांगला परतवा दिला आहे. आता भारतातील परिस्थिती आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने आगेकूच करू शकतील अशी परिस्थिती आहे.
भारताबरोबरच परदेशी गुंतवणूकदार फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड या देशातही गुंतवणूक करीत असल्याचे वातावरण आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की. अगोदर परदेशी गुंतवणूकदार चीनमध्ये गुंतवणूक करीत होते. मात्र आता चीनची परिस्थिती खराब झाल्यामुळे तेथील काही गुंतवणूक भारताकडे वळत आहेत.




