शेअर बाजारात घसरण; व्यापार कराराच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता

मुंबई – भारत- अमेरिकेत दरम्यान समाधानकारक व्यापार करार होण्याची जास्त शक्यता आहे. मात्र तरीही जोपर्यंत प्रत्यक्ष करार होत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घेणे अवघड झाले आहे. यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्क्याची घट झाली. अमेरिकेला निर्यात करणार्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावावर गेल्या आठवड्यापासून दबाव कायम आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 375 अंकांनी कमी होऊन 82,259 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी म्हणजे 0.40% कमी होऊन 25,111 अंकावर बंद झाला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्री चालू केली आहे. बुधवारी या गुंतवणूकदारांनी 1,858 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली. त्याचबरोबर ज्या कंपन्यांनी पहिल्या तिमाहिचे ताळेबंद जाहीर केले आहेत ते फारसे समाधानकारक नाहीत. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर चालू असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले,
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस,एचसीएल टेक, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर दबाव कायम राहिला. त्याचबरोबर इटर्नल, लार्सन अँड ट्यूबरो, अक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. टाटा स्टील, ट्रेन्ट, टायटन, टाटा मोटर्स कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, पहिल्या तिमाहितीचे ताळेबंद समाधानकारक नसल्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. गुंतवणूकदार सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्याची आकडेवारी जाहीर होऊनही शेअर निर्देशांकात गेल्या काही दिवसापासून घट होत आहे.
जागतिक बाजारात आज संमिश्र वातावरण होते. दक्षिण कोरिया, जपान, शांघाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. युरोपीय समुदाय व अमेरिकन शेअर बाजारातही निर्देशांकात अल्प प्रमाणात वाढ झाली होती.




