परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे शेअर बाजार सलग आठव्या दिवशी घसरला; रुपयावर दबाव कायम

मुंबई – परदेशातील नकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण सलग आठव्या दिवशी कायम राहिले. यामुळे मुख्य निर्देशांकांचे नुकसान चालूच राहिले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असल्यामुळे निर्देशांकावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 97 अंकांनी कमी होऊन 80,267 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी कमी होऊन 24,611 अंकावर बंद झाला, धातू, वाहन, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र रिअॅल्टी आणि ग्राहक वस्तू क्षेत्राच्या कंपन्यावर दबाव कायम होता.
रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारी सुरू झाली. बुधवारी पतधोरण जाहीर होणार असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार कुंपणावर बसून होते. मात्र या आठवड्यात विक्रीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे, असे जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. नायर म्हणाले की, एकूण परिस्थिती पाहता रिझर्व बँक यावेळी व्याजदर कमी करणार नाही. मात्र भविष्यातील व्याजदराच्या धोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
आयटीसी, भारती एअरटेल, ट्रेन्ट, बजाज फिन्सर्व, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. छोट्या कंपन्यापैकी मॅन इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर 10.6 टक्क्यांनी कोसळला. बाजार नियंत्रक सेबीने या कंपनीच्या तीन अधिकार्यांना शेअर बाजारात काम करण्यास मज्जाव केला आहे.
जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालू असून या गुंतवणूकदारांनी सोमवारी 2,831 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,845 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
रुपयाच्या मूल्यावरील दबाव कायम –
रिझर्व बँक रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून डॉलरची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य कमी होत आहे. मंगळवारी रुपयाचा भाव पुन्हा चार पैशांनी कमी होऊन 88.79 रुपये प्रति डॉलर या निचांंकी पातळीवर गेला.
खनिज तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढत असताना भारतातील परदेशी गुंतवणूक डॉलरच्या स्वरूपात परत जात असल्यामुळे भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर शेअर बाजाराचे निर्देशांकही गेल्या आठ दिवसापासून एकतर्फी कमी होत आहेत. याचाही रुपयांच्या मूल्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
अशा परिस्थितीत रिझर्व बँक पतधोरणात रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी काय निर्णय घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 2,831 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करून आपला विक्रीचा मारा कायम ठेवला आहे. जागतिक चलन बाजारात इतर चलनाच्या तुलनेत डॉलरच भाव फारसा वधारत असल्याचे दिसून येत नाही. मात्र भारतातून डॉलर परदेशात जात असल्यामुळे भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव येत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
फिनेक्स ट्रेझरी अॅडवायझर्स या कंपनीचे प्रमुख अनिल कुमार भन्साळी यांनी सांगितले की, एकीकडे रिझर्व बँक डॉलरचा पुरवठा वाढवत आहे तर त्यापेक्षा जास्त मागणी परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे या संस्थांना डॉलरचा पुरवठा करावा लागत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. त्यातच जागतिक व्यापारात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




