सलग 7 दिवस शेअर बाजारात घसरण! रुपया पुन्हा ऐतिहासिक निचांकीवर; अमेरिकन निर्णयांचा भारतावर जबरदस्त परिणाम

मुंबई – परदेशी गुंतवणूकदारांकडून विविध कारणामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री कायम आहे. पत धोरणाच्या पार्श्वभूमीवर या गुंतवणूकदारांनी बँकांच्या शेअरची बरीच विक्री केली. अशा परिस्थितीत सलग सातव्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 61 अंकांनी कमी होऊन 80,364 अंकावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19 अंकांनी म्हणजे 0.08 टक्क्यांनी कमी होऊन 24,634 अंकावर बंद झाला. गेल्या सात दिवसात निफ्टी 3 टक्क्यांनी कमी झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आता निर्देशांक घसरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मारुती सुझुकी, अॅक्सीस बँक, लार्सन अँड ट्युबरो, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर स्टेट बँक, ईटर्नल, ट्रेन्ट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, भारत -अमेरिका व्यापार धोरणाबाबत कमालीची संदिग्धता आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्रीत चालूच आहे. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर आहेत. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी सध्याच्या आणि अनिश्चित परिस्थितीत निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न देशातील संस्थागत गुंतवणूकदार करीत असल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,687 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र शुक्रवारी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,843 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. एक महिन्यामध्ये देशातील गुंतवणूकदारांनी निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला आह. मात्र तरीही निर्देशांक बर्याच प्रमाणात कमी झाले आहेत.
रुपया घसरून पुन्हा निचांकी पातळीवर –
गेल्या आठवड्यात रिझर्व बँकेने रुपयाला आधार देण्यासाठी बराच प्रयत्न केला होता. म्हणून रुपयाची घसरण थांबली होती. मात्र सोमवारी पुन्हा रुपयाचा दर सात पैशांनी घसरून 88.79 प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर आणि रोखे बाजारात विक्री चालूच ठेवल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांकही घसरत असल्यामुळे रुपया घसरत आहे असे विश्लेषकानी सांगितले. अमेरिकेने भारताविरोधात नकारात्मक भूमिका घेतली आहे.
भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांना अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा शुल्क 5,000 डॉलरवरून एक लाख डॉलर इतके केले आहे. त्यानंतर अमेरिकेने औषधी आयातीवर 100 टक्के आयात शुल्क लावले आहे. व्यावसायिक वाहने आणि फर्निचरवर आयात शुल्क वाढविले आहे. अशा परिस्थितीत भारताच्या निर्यातीवर याचा नकारात्मक परिणाम होऊन भारताची चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्यता असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी आणि इतर बाबीवर रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती एक आक्टोबर रोजी काय निर्णय घेते याकडे चलन बाजारातील व्यापार्यांचे लक्ष लागले आहे. महिन्याच्या शेवटी आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढत असते. अशा परिस्थितीत महिन्याच्या शेवटी रुपयाचे मूल्य काही प्रमाणात कमी होत असते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रुपयाचे मूल्य पुन्हा स्थिर होईल असे काही चलन व्यापार्यानी सांगितले.
सरलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठ्यात 39 दशलक्ष डॉलरची घट होऊन हा चलन साठा 702.57 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. हा साठा भारताला आयातीसाठी आणि रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी पुरेसा आहे, असे समजले जाते.




