Stock Market: भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पडझड पाहायला मिळाली असून, विशेषतः माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ५५८.७२ अंकांनी म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी घसरून ८३,६७४.९२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक ‘निफ्टी’मध्येही १४६.६५ अंकांची घसरण होऊन तो २५,८०७.२० च्या पातळीवर स्थिरावला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे २.५ लाख कोटी रुपये एकाच दिवसात बुडाले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक तब्बल ५ टक्क्यांनी कोसळला – बाजारातील या पडझडीला प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील नकारात्मक वातावरण कारणीभूत ठरले. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे (AI) भविष्यात आयटी कंपन्यांच्या कमाईवर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निफ्टी आयटी निर्देशांक तब्बल ५ टक्क्यांनी कोसळून १० महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला. यामध्ये टेक महिंद्राचा शेअर सर्वाधिक ६ टक्क्यांनी घसरला, तर इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएल टेक यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकन बाजारपेठेत आयटी शेअरमध्ये झालेल्या विक्रीचा आणि तिथल्या व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाल्याचा थेट फटका भारतीय बाजाराला बसला आहे. stock market ‘कंझ्युमर ड्युरेबल्स’ हिरव्या निशाणात – आयटी क्षेत्रासोबतच ऑईल अँड गॅस, मीडिया आणि रिअल्टी निर्देशांकातही प्रत्येकी एक टक्क्याची घसरण झाली. केवळ ‘कंझ्युमर ड्युरेबल्स’ निर्देशांक वाढीसह हिरव्या निशाणात बंद होऊ शकला. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आदल्या दिवशीच्या ४७४.९९ लाख कोटी रुपयांवरून घसरून ४७२.३० लाख कोटी रुपयांवर आले आहे. बाजारात एकूण ४,३६८ शेअरमध्ये व्यवहार झाले, त्यापैकी २,५२७ शेअर घसरणीसह बंद झाले, तर १,६८३ शेअरमध्ये वाढ पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील रोजगाराच्या ताज्या आकडेवारीनंतर फेडरल रिझर्व्ह नजीकच्या काळात व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे. भारताची आर्थिक वृद्धी चांगली असली तरी महागाईचे लक्ष्य गाठण्यासाठी आरबीआय देखील सध्यातरी व्याजदर कपातीचा विचार करणार नाही, असे संकेत मिळत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि अमेरिका-इराणमधील वाढता तणाव यामुळे जागतिक बाजारातून कमकुवत संकेत मिळाले, ज्याचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.