देश-विदेशातील शेअर बाजारात हाहा:कार

मुंबई – देशविदेशातील अनेक नकारात्मक घटनामुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण कायम आहे. आज अमेरीका, युरोप, आशिया खंडातील शेअर बजाराचाचे निर्देशांक कोसळले. त्यामुळे भारतीय शेअर बजाराचे निर्देशांकही कोसळून गुंतवणूदारांचे मोठे नुकान झाले.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निदेशांक सेन्सेक्स 1,414 अंकांनी (1.90 टक्के) घसरला आणि तो 73,198 या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील 420 अंकांनी (1.86 टक्के) घसरून 22,124 वर बंद झाला.
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 9 लाख कोटींची घट झाली आहे. सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरण झाली आणि फक्त एक (एचडीएफसी बँक) तेवढा वधारला. निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये घसरण झाली आणि फक्त 5 मध्ये वाढ झाली. आज एनएसईच्या सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये घसरण झाली.
आयटी,ऑटो,मीडिया, सरकारी बँका, मेटल, फार्मा, बँकिंग, एफएमसीजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 2 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. बाजारातील आजच्या घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय, जीडीपी डेटाची चिंता आणि आयटी स्टॉक्सची निराशजनक कामगिरी असल्याचे बाजार तज्ञांचे मत आहे.
मंदावलेली वाढ, कमाईचा दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजार सप्टेंबरच्या अखेरीस विक्रमी उच्चांकावरून 14% खाली आला आहे. दुसरीकडे अमेरिकेतील एनव्हीडियाच्या कमाईत घट झाल्यानंतर आयटी स्टॉक्सवर पुन्हा दबाव आला, ज्यामुळे जागतिक स्तरावर एआय स्टॉक्समध्ये मोठी विक्री झाली आहे. निफ्टी आयटी इंडेक्स 3.2% घसरला.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयातकर वाढविण्याची घोषणा केली आहे. 4 मार्चपासून मेक्सिको आणि कॅनडा वरून येणार्या वस्तूंवर 25 टक्के कर लावला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. तसेच चीनवरून येणार्या वस्तूंवरही 10 टक्के अतिरिक्त आयातकर लावला जाईल. युरोपियन संघाच्या वस्तूंवरही 25 टक्के आयातकर लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गेल्या काही दिवसांपासून आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावत आहेत. फेब्रुवारी महिन्यात विदेशी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 46,000 कोटींच्या शेअर्सची विक्री केली. तर जानेवारी महिन्यात 1.33 लाख कोटींच्या शेअर्सची विक्री झाली होती. यामुळे बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. या विक्रीमुळे रुपयावरील दबाव वाढत आहे. अशातच आता रुपयाची किंमतही आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण
आज बाजारात आयटी स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. एनविडिया सारख्या अमेरिकन कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रावरही त्याचा परिणाम जाणवला. आयटी क्षेत्रामध्ये 4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. टेक महिंद्रा, एमफासिस, पर्सिस्टंट सिस्टम हे शेअर्स सर्वात खाली गेले. अमेरिकेच्या बाजारात पुढील काही दिवसात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे आयटी कंपन्यांना अधिक नुकसान होऊ शकते.





