Stock Market collapse – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर लावलेल्या ‘जशास तसे’ आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू झाली आहे. असे असतानाच चीन आणि अमेरिकेदरम्यानचे व्यापार युद्ध जास्त वाढले आहे. परिणामी पुन्हा जागतिक शेअर बाजारात निराशावाद पसरला असून अमेरिकेसह युरोप, आशिया खंडातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. दरम्यानच्या काळात रिझव्हर्र् बँकेने व्याजदरात पुन्हा पाव टक्के कपात करूनही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अर्धा टक्क्याने कमी झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 379 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी कमी होऊन 73,847 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 534 अंकांनी कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136 अंकांनी कमी होऊन 22,399 अंकावर बंद झाला. अमेरिका, युरोप आणि आशियाई शेअर बाजारात निर्देशांक ज्या प्रमाणात कमी झाले त्या प्रमाणात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. दरम्यानच्या काळात अमेरिकेने चीनवर 104% आयात शुल्क लावल्यानंतर चीननेही अमेरिकेवर 84 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँक पिछाडीवर मंदीच्या शक्यतेमुळे बँकिंग क्षेत्राच्या उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बँकांच्या शेअरची बरीच विक्री झाली. स्टेट बँकेचा शेअर साडेतीन टक्क्यांनी कोसळला. मंदीमुळे अमेरिकेत सॉफ्टवेअरची निर्यात कमी होणार असल्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची पीछेहाट झाली. टेक महिंद्रा, लार्सन अॅण्ड ट्यूबरो, टाटा स्टील, सनफार्मा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. ग्राहक वस्तू, वाहन क्षेत्र आघाडीवर मंदीच्या परिस्थितीतही जीवन उपयोगी ग्राहक वस्तूची विक्री कायम राहणार आहे. त्याचबरोबर कमी व्याजदरामुळे वाहन विक्री वाढण्याची शक्यता आहे. कारण वाहनांची निर्मिती बर्याच प्रमाणात देशातच होते. या कारणामुळे या दोन्ही क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. करोनाच्या काळातही या दोन क्षेत्रावर जास्त परिणाम झाला नव्हता. मात्र इतर क्षेत्रांची पीछेहाट कायम चालू आहे. मंदीचा सामना करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ते आपल्या निर्णयात सहजासहजी बदल करणार नाहीत. सध्या घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेसह विविध देशात मंदी निर्माण होणे गृहीत धरले जात आहे. अशा परिस्थितीत विविध देश या परिस्थितीचा लघु, मध्यम आणि दीर्घ पल्ल्यात कसा सामना करावा याची तयारी करू लागले आहेत. अमेरिकेशिवाय इतर देश परस्परादरम्यान व्यापार वाढविणे, देशांतर्गत बाजारपेठेला चालना देणे या विषयावर काम करीत आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.धार्मिक कारणामुळे गुरुवारी शेअर बाजार बंद राहणार आहेत.