Stock Market : शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा दबाव; गुंतवणूकदारांचे 72 हजार कोटी रुपये बुडाले
Stock Market : शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा घसरण झाली. सेन्सेक्स 70.71 अंकांनी तर निफ्टी 29.85 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे सुमारे 72 हजार कोटींचे नुकसान झाले.

Stock Market : भारतीय शेअर बाजारात शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी पुन्हा विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. त्यामुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 72 हजार कोटी रुपयांची घट झाली.
फार्मा आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारावर दबाव राहिला. निफ्टी फार्मा आणि मेटल निर्देशांकात 0.70 ते 0.90 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
एनएसईचा निफ्टी 50 निर्देशांक 29.85 अंकांनी घसरून 24,366 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात तो 24,296 अंकांपर्यंत खाली आला होता. तर बीएसई सेन्सेक्स 70.71 अंकांच्या घसरणीसह 78,009 अंकांवर स्थिरावला.
निफ्टीतील टॉप गेनर्स-लूजर्स –
निफ्टी 50 मधील टॉप लूजर्समध्ये टाटा मोटर्सचा समावेश राहिला. कंपनीचा शेअर 4.3 टक्क्यांनी घसरला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 2.56 टक्के, एशियन पेंट्समध्ये 2.15 टक्के आणि हिंडाल्कोमध्ये 1.6 टक्क्यांची घसरण झाली.
दुसरीकडे, अपोलो हॉस्पिटल्सचा शेअर 3.85 टक्क्यांनी वधारला. भारती एअरटेलमध्ये 2.7 टक्के, तर अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये 2 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली.
गुंतवणूकदारांचे 72 हजार कोटींचे नुकसान –
एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी बाजाराच्या कमजोर कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 72 हजार कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 492.88 लाख कोटी रुपयांवरून घटून 492.16 लाख कोटी रुपयांवर आले.





