सलग तिसर्या दिवशी शेअर निर्देशांकात घट; अमेरिकेसोबतच्या करारास विलंब होत असल्याचा परिणाम

मुंबई : अमेरिकेचे बहुतांश महत्वपूर्ण देशाबरोबर किंवा देशाच्या समूहाबरोबर व्यापार करार झाले आहेत. मात्र भारताबरोबरचा व्यापार करार अजून झालेला नाही, हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. यामुळे सोमवारी शेअर बाजारातील विक्री कायम राहिली. सलग तिसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात पाऊण टक्के घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 572 अंकांनी म्हणजे 0.70 टक्क्यांनी कमी होऊन 80,891 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 156 अंकांनी कमी होऊन 24,680 या दोन महिन्याच्या निचांकी पातळीवर बंदं झाला. निफ्टी संदर्भातील 35 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 15 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
एकीकडे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार जागतिक अनिश्चिततेमुळे एकतर्फी विक्री करत असतानाच भारतीय कंपन्यांनी पहिल्या तिमाहित फारसे चमकदार टाळे बंद जाहीर केलेले नाहीत. अशा परिस्थितीत गेल्या तीन दिवसात निफ्टी दोन टक्क्यांनी म्हणजे 539 अंकांनी घसरला आहे. तर सेन्सेक्स 2.2 टक्क्यांनी म्हणजे 1,835 अंकांनी घसरला आहे.
कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स या बड्या कंपन्या बरोबरच टीसीएस, टायटन, एचसीएल टेक, स्टेट बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिका- युरोप व्यापार करार झाल्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण होते. मात्र भारत -अमेरिका करार होत नसल्यामुळे गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. अशा परिस्थितीत निर्देशांक कमी होत आहेत. एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.





