Smith DRS Warning : “घ्या ना रिव्ह्यू, आणखी एक वाया घालवा!”; स्टीव्ह स्मिथचा बांगलादेशी खेळाडूंशी ‘DRS माइंड गेम’; पंचांनी दिली तंबी
Smith DRS Warning : बांगलादेशी खेळाडूंच्या डीआरएसच्या चर्चेत थेट हस्तक्षेप करत त्यांना रिव्ह्यू घेण्यासाठी उकसवणे स्मिथला चांगलेच महागात पडले.

Umpire Warning Steve Smith DRS Mind Games Najmul Hossain Shanto AUS vs BAN Test : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि बांगलादेश संघ यांच्यातील डीआरएसवरून (DRS) सुरू असलेले शाब्दिक युद्ध मॅके येथील दुसऱ्या कसोटीतही पाहायला मिळाले. बांगलादेशी खेळाडूंच्या डीआरएसच्या चर्चेत थेट हस्तक्षेप करत त्यांना रिव्ह्यू घेण्यासाठी उकसवणे स्मिथला चांगलेच महागात पडले. या अयोग्य वर्तणुकीमुळे मैदानावरील भारतीय पंच नितीन मेनन (Nitin Menon) आणि त्यांच्या सहकारी पंचांनी स्मिथला थेट मैदानात अडवून कडक शब्दांत चेतावणी (Warning) दिली.
‘घ्या रिव्ह्यू’; कर्णधार शांतोला उकसवताना पंचांनी पकडले!
ही नाट्यमय घटना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९ व्या षटकात घडली. तस्कीन अहमदचा चेंडू स्मिथच्या पॅडला लागताच जोरदार अपील झाले, मात्र पंच नितीन मेनन यांनी नाबाद घोषित केले. यानंतर तस्कीनने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. तेवढ्यात स्मिथ बांगलादेशी खेळाडूंच्या जवळ गेला आणि म्हणाला, “मी क्रीजच्या खूप पुढे होतो, चेंडू स्टंप्सच्या वरून जात आहे.” शांतो चर्चा करत असताना स्मिथने हाताने खुणावत “रिव्ह्यू घेऊन टाका” असे म्हणत डिवचले. यावर पंचांनी तत्काळ हस्तक्षेप करत रिव्ह्यू घेण्याचा निर्णय केवळ गोलंदाजी करणाऱ्या संघाचा असून त्यात फलंदाजाने ढवळाढवळ करू नये, अशी तंबी स्मिथला दिली.
डार्विनच्या पहिल्या कसोटीतही खेळला होता असाच ‘माइंड गेम’!
स्मिथचा बांगलादेशविरुद्ध हा ‘डीआरएस माइंड गेम’ डार्विन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीपासून सुरू आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात इबादत हुसेनच्या अपीलवर बांगलादेशी खेळाडू रिव्ह्यूचा विचार करत असताना स्टंप माईकमध्ये स्मिथचा आवाज कैद झाला होता. “तुम्ही काय गेम बघत आहात? चेंडू खूप वर लागलाय,” असे स्मिथ म्हणाला होता. स्मिथच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून बांगलादेशने रिव्ह्यू घेतला नाही आणि रिप्लेमध्ये चेंडू खरोखरच स्टंप्सच्या वरून जात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या सामन्यात स्मिथने ७१ धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या डावात लिटन दासशी झाली होती जोरदार खडाजंगी!
डार्विन कसोटीच्या दुसऱ्या डावातही ताइजुल इस्लामच्या चेंडूवर झेलची अपील फेटाळल्यानंतर स्मिथने बांगलादेशी खेळाडूंना चिडवत “रिव्ह्यू घ्या, आणखी एक रिव्ह्यू वाया घालवा,” असा टोला लगावला होता. यावर बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दास प्रचंड भडकला होता आणि त्याने स्मिथला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. मॅकेमधील ताज्या घटनेवरून स्मिथ सातत्याने बांगलादेशी संघाचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी डीआरएसचा हत्यारासारखा वापर करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.





