रस्त्यासाठी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या!

नगर – दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह-उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे कामासाठी शासनाने 2 कोटी 5 लाख निधी मंजूर केला. तरी या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात बुधवारी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी दीपक गुगळे, अमित गांधी, शहानवाज शेख, गौतमी भिंगारदिवे, विजय मिसाळ आदीसह पदाधिकारी सहभागी झाले होते. मागील चार ते पाच महिन्यापासुन रस्त्याचे काम अर्ध्यात बंद केले आहे. रस्त्याचे काम सुरू करावा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशारा दिला होता. कार्यालयाच्या वतीने या रस्त्याचे कामाची जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत चौकशी सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत काम सुरू करू शकत नाही असे लेखी कळवले होते.
आज त्यालाही जवळपास चार महिन्याचा कालावधी उलटलेला असून काही ठराविक लोकांच्या राजकारणासाठी सर्वसामान्य जनतेला अद्यापपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी दळणवळण करण्यासाठी अनेक समस्या येऊन छोटे मोठे अपघात होत आहे. त्यामुळे जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. येत्या 10 दिवसात या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.





