Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अटकेला स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलं?
एक तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकल खंडपीठाने गर्दीने भरलेल्या न्यायालयात हा आदेश दिला.

Swami Avimukteshwaranand – अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या पोक्सो प्रकरणात नाव असलेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि मुकुंदानंद गिरी यांच्या अटकेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील आदेश राखून ठेवला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी एक तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकल खंडपीठाने गर्दीने भरलेल्या न्यायालयात हा आदेश दिला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद यांच्यासाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
आशुतोष ब्रह्मचारी यांच्या अर्जावर विशेष न्यायाधीश यांच्या आदेशानंतर गेल्या रविवारी झुंसी पोलिस ठाण्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. खटला दाखल झाल्यानंतर झुंसी पोलिसांनी चौकशी केली आहे. पीडितांचे जबाब आणि वैद्यकीय तपासणी देखील घेण्यात आली आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी मुकुंदनंद यांच्यावर माघ मेळा २०२६ आणि महाकुंभ २०२५ दरम्यान अल्पवयीनावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुनावणीपूर्वीच न्यायालय क्रमांक ७२ खचाखच भरले होते.
बचाव पक्षाने एक पीडित अल्पवयीन असल्याचा दावा केला. पीडितांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. वरिष्ठ वकील दिलीप गुप्ता, अतिरिक्त महाधिवक्ता मनीष गोयल, सरकारी वकील पतंजली मिश्रा आणि तक्रारदाराच्या वकील रीना एन. सिंह यांनी अर्जावर आपले युक्तिवाद सादर केले.





