आव्हाडांच्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद; मुंबई, पुण्यासह विविध शहरांत आंदोलन, गुन्हेही दाखल

Jitendra Awhad – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपने या प्रकरणी मुंबई, पुण्यासह विविध शहरांत आंदोलन करून आव्हाड यांच्या विरोधात नारेबाजी केली. देशासह राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
भाजप याप्रकरणी आक्रमक झाली असून भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपर येथील पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भाजपकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे आव्हाड यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
आता ठाकरेंचा सामना गप्प का?- राम कदम
यावेळी बोलताना राम कदम म्हणाले, आव्हाड धादांत खोटे बोलत आहेत. एकाच संप्रदायासाठी आव्हाड अशा प्रकारचे वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागेल. तसेच, यावेळी त्यांनी आता ठाकरेंचा सामना गप्प का? असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.
काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांकडून निषेध
नाशिक काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी आव्हाडांच्या वक्त्यव्याचा निषेध केला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनीही आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. आव्हाड यांचे विधान खोटे असून धर्मग्रंथात प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचा कुठेही उल्लेख नाही असे ते म्हणाले.
आव्हाडांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त !
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला आहे. आव्हाड यांच्या घराबाहेर प्रभू श्रीरामांचे चित्र घेऊन हे कार्यकर्ते आरती करण्यासाठी पोहोचले होते. यांनतर आव्हाड यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





