वारीबाबतच्या वादग्रस्त विधानावरून अबू आझमींना नोटीस बजावणार; राज्य अल्पसंख्यांक आयोगाचा इशारा

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सध्या आषाढी वारीसाठी पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. याच मुद्द्यावरुन अबू आझमी यांनी, पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतो, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. नमाजसाठी तक्रार होते, अशा आशयाचे विधान केले आहे. या विधानानंतर अनेकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अबू आझमींना सेक्शन 10 प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे.
“अबू आझमी यांचे वारी संदर्भातील वक्तव्य दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून आयोग अबू आझमी यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना सेक्शन 10 प्रमाणे नोटीस ही बजावणार आहे. गरज भासली तर त्यांना आयोगासमक्ष उपस्थित राहून उत्तर देण्यासही सांगण्यात येईल,” असे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले.
अबू आझमी नेमकं काय म्हणाले ?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत म्हंटले होते की, “आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जावा, नाही तर पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत,” असे विधान अबू आझमी यांनी केले. Abu Azmi |
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
दरम्यान, अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. अबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधान केले की, प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते. त्यामुळे अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळे त्यांच्या फालतू वक्तव्याला उत्तर देणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांचा समाचार घेतला. Abu Azmi |
हेही वाचा:
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये दुर्घटना; ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर भीषण आग, सेट जळून खाक





