पुणे | राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार जाहीर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या रविवारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांच्या हस्ते शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात त्याचे वितरण होणार आहे. याविषयी बालकुमार संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. न. म. जोशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे, तसेच पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे उपस्थित राहणार आहेत. यासाठी राज्यातून दहा पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली असून, पुरस्कारार्थी खालीलप्रमाणे आहेत.
पुरस्कारार्थी : बालकथा विभाग – रेखा बैजल जालना (तुमचा आमचा संजू), रश्मी गुजराथी पुणे (आभाळातील जहाज), नागेश शेवाळकर पुणे (मोबाईल माझा गुरू), बालकाव्य विभाग – मीनाक्षी आचमे नांदेड ( इटूकली पिटूकली) जयश्री पाटील सांगली (बालजगत), ललिता सबनीस पुणे (लहानपण देगा देवा) , बालकादंबरी विभाग – बबन शिंदे हिंगोली (वंचितांचे राजे छ. शाहू महाराज), बालनाटिका विभाग – शुभदा सुरंगे पुणे (घर पळून गेलं), नाट्यछटा विभाग – डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर (बहुढंगी बहुरंगी), मुलांचा काव्यसंग्रह विभाग – मसाप मावळ शाखा (परीघ).
