राज्य सरकार-राज्यपाल वाद पेटणार; कोश्यारी म्हणतात फडणवीसांच्या मागण्या योग्यच

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्या योग्य असल्याचे राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सूचना देखील केल्या आहेत. यापूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रे लिहिलेली आहेत. त्यावर नेहमीच मोठे राजकीय वाद झाले. तसेच आरोप-प्रत्यारोपही झालेले आहेत. आता विधानसभा अध्यक्षपद निवडीबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र पाठवले आहे.
कोश्यारी यांनी ठाकरे यांना पुन्हा पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण करून दिली आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हे पत्र लिहिले आहे. यात राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचे सांगत कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
राज्यपालांनी 24 जून रोजी हे पत्र लिहिले आहे. मात्र ते बुधवारी सकाळपासून समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आणि सत्ताधारी-विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर तुटून पडले होते. महाराष्ट्राचे राजभवन हे भाजप कार्यालय झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
दरम्यान, आजच्या नव्या पत्रात राज्यपाल म्हणतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी दोन निवेदने दिली. विधानसभा अधिवेशन कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्षांची निवड करावी, ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जि. प. निवडणुका स्थगित कराव्यात आदींचा त्यात समावेश असल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच या मागण्या योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





