पुणे | राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असेल. राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन या धोरणाच्या माध्यमातून मिळेल. लवकरच या धोरणाला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सांस्कृतिक धोरण २०१० पुनर्विलोकन समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने रविवारी मुंबईत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगले आदी यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारचे सांस्कृतिक धोरण हे खऱ्या अर्थाने बहुआयामी असे असणार आहे. आपल्या संस्कृतीची ओळख त्यातून प्रतिबिंबीत व्हावी, यासाठी हे धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. धोरण समितीने दिलेला अहवाल आणि त्यातील शिफारशी लक्षात घेऊन राज्य शासन व्यापक असे सांस्कृतिक धोरण जाहीर करेल.
राज्यातील गड किल्ले, कारागिरी, पुरातत्व, भाषा साहित्य ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती, लोककला, भक्ती संस्कृती, संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, दृश्यकला अशा विविध बाबींचा विचार या धोरणात असेल. याशिवाय, राज्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण बाबींचाही यात समावेश असेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात विविध संस्कृती, पेहराव, खाद्य, आभूषण, मौखिक संस्कृती आहे. ती जपली जावी, यादृष्टीने काय करता येईल याचाही विचार केला जाणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी सांस्कृतिक धोरण २०१० पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष डॉ. सहस्त्रबुद्धे यांनीही या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने माहिती दिली. या धोरणात सर्वसमावेशकतेचा आग्रह धरण्यात आला आहे. या समितीच्या एकूण १८ बैठका झाल्या. तसेच, विविध विषयांच्या अनुषंगाने नेमलेल्या उपसमितीच्या १०८ बैठका झाल्या. समितीकडे एकूण १३७ व्यक्ती आणि ४३ संस्था-संघटनांनी त्यांची निवेदने सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
या धोरणाचा मसुदा मंत्रीमंडळासमोर ठेवला जाईल. त्यापूर्वी या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने इतर शासकीय विभागांशी निगडीत बाबींसंदर्भात त्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे खारगे यांनी, सांगितले.





