राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं दिले महत्वाचे संकेत

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित आणि रखडलेला विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. तसे संकेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शुक्रवारी दिले.
शिवसेनेत फूट पडल्याने जून २०२२ मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक गट फुटून महायुती सरकारचा भाग बनला.
त्या गटाला मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले. त्यामुळे मंत्री बनण्यासाठी उत्सुक असणाऱ्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना वेटिंगवरच रहावे लागले. आता विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे.
त्यामुळे सत्ताधारी गोटातून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना शिरसाट यांनी आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर गुरूवारी बैठक झाली. त्यामध्ये विस्ताराबाबत चर्चा झाली असावी, असेही त्यांनी सूचित केले. साधारणपणे दोन महिन्यांनी आगामी निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होऊ शकते.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास नव्या मंत्र्यांना कामकाजाची फार संधी मिळणार नाही. त्याकडे लक्ष वेधल्यावर शिरसाट यांनी मंत्रिपदांमुळे संबंधितांचा मतदारसंघांमधील प्रभाव आणखी वाढेल. त्याचा लाभ सत्तारूढ महायुतीला होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला.





