ओझर : भारतीय स्टेट बँकेचा ७० वा वर्धापन दिन शिरोली तर्फे आळे शाखेकडून सामाजिक बांधिलकी जोपासत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बँकेच्या शिरोली तर्फे आळे शाखे कडून आयोजित या उपक्रमात ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून बँकेच्या सामाजिक जबाबदारीला साथ दिली. २१९ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या आणि देशाची आर्थिक रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवत हा उपक्रम राबविला. या वेळी सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच बँकेच्या ग्राहकांना मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन बँकेच्या पुणे विभागाचे उप महाप्रबंधक कुमार परिमल प्रेम व पुणे ग्रामीणचे प्रादेशिक व्यवस्थापक राजीव गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा प्रबंधक कल्पेश कोठारी आणि स्टाफ युनियन पुणे विभागाचे पदाधिकारी संदीप वैद यांनी केले होते. रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिरोली, सुलतानपूर व पंचक्रोशीतील विविध गावांतील संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सरपंच तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बँकिंगला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या स्टेट बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले.