पुणे जिल्हा | शिक्रापुरात स्टेट बँकेची शाखा आगीत खाक

शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये बँक पूर्णपणे जाळून खाक झाली.
यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दोन अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. ऐन वर्दळीच्या ठिकाणी बँकेला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर येथील स्टेट बँकेसमोरुन महिला पोलीस हवालदार किरण निकम या पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना बँकेच्या आतमधून धुराचे लोट येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनसह अग्निशमक दलाला माहिती दिली.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवालदार रोहिदास पारखे, किरण निकम, ललित चक्रनारायण, बँकेचे व्यवस्थापक अमोल नफाडे, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर, दीपक भुजबळ, नाना गिलबिले, ओंकार हिरवे,
सोमनाथ भुजबळ आदींनी नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने पुणे महानगर विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील दोन अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी रांजणगावचे उपअग्निशमन अधिकारी महेंद्र माळी, अशोक हातवटे, अमोल गायकवाड, सचिन शेंडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अल्ताब पटेल, लक्ष्मण मिसाळ, प्रशांत अडसूळ, महेश पाटील, संकेत कुंभार, कृष्णा नांगरे आदींनी आग आटोक्यात आणली, मात्र, आगीमध्ये बँकेचे सर्व साहित्य, कागदपत्रे, कॉम्प्युटर, फर्निचर जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, बँकेचे मुख्य लॉकर सुरक्षित राहिले आहे.





