Pune: फर्निचर गोदामात आग; सुदैवाने कोणीही जखमी नाही

पुणे : नगर रस्त्यावरील चंदननगर भागात फर्निचरच्या गोदामात बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांंनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
नगर रस्त्यावरील चंदननगर जकातनाका परिसरात वाघेश्वर पार्किंगजवळ फर्निचरचे गोदाम आहे. बुधवारी सकाळी गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्यााचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोदामातील फर्निचरने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. या आगीत फर्निचर जळून खाक झाले आहे.
यावेळी गोदामाची पाहणी करण्यात आली, तेव्हा गोदामात कोणी नसल्याचे आढळून आले. तसेच या आगी मागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनखाली जवानांनी आग आटोक्यात आणली.





