खासगी न्याहारी आणि निवास केंद्राचे बुकिंग सुरू

एमटीडीसीकडून पर्यटकांना दिलासा
पुणे – यंदाचा उन्हाळा कडक असला तरी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झालेला नाही. त्यामुळे खात्रीशीर असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे बुकिंगसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पर्यटकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. महामंडळानेही या मागण्यांची दखल घेत खासगी न्याहारी आणि निवास केंद्राचे बुकिंग सुरू केले आहे, त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटकांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे, त्यामुळे महामंडळाकडे पर्यटकांचा ओघ अधिकच वाढत चालला आहे. मात्र, पर्यटकांच्या तुलनेत महामंडळाची यंत्रणा खूपच कमी असल्याने पर्यटक नाराज होत होते. त्यामुळे महामंडळाच्या वतीने स्थानिक नागरिकांना खाजगी तत्वावर निवास आणि न्याहारी केंद्राची कंत्राटे दिली आहेत. त्यांचे दर महामंडळाने ठरविले आहेत, त्याशिवाय त्यांच्या खाद्यपदार्थावरही महामंडळाचीच नजर आहे. त्यामुळे ही केंद्रे पर्यटकांसाठी वरदान ठरत आहेत, विशेष म्हणजे त्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
यंदा उन्हाळा कडक असल्याने हा व्यवसाय मंदावेल, असे आडाखे महामंडळाच्या वतीने बांधण्यात येत होते. मात्र, उन्हाळा कडक असला तरीही पर्यटकांची मागणी अधिकच वाढत चालली आहे. विशेष म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच खाजगी तत्वावरील निवास आणि न्याहारी केंद्राचे बुकिंग पुन्हा सुरु करावे अशी मागणी पर्यटकांच्या माध्यमातून होत होती. त्यांची ही मागणी मान्य करुन हे बुकिंग सुरु करण्याच्या सूचना संबधित विभागाला देण्यात आल्या आहेत अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.





