Cameron Green : आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात; आयपीएल स्टारने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे ती?
Cameron Green : लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले असून, त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Cameron Green : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीन याने त्याची दीर्घकाळाची जोडीदार एमिली रेडवुड हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तब्बल पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी ४ सप्टेंबर रोजी विवाह केला. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले असून, त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या फोटोंमध्ये २७ वर्षीय कॅमेरॉन ग्रीन काळ्या रंगाच्या क्लासिक सूटमध्ये अतिशय देखणा दिसत आहे. तर त्याची पत्नी एमिली रेडवुड पांढऱ्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये लक्ष वेधून घेत आहे. पर्थमधील कॉटेस्लो येथील सिव्हिक सेंटर ग्राऊंडवर या दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला.
लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर कॅमेरॉन आणि एमिली मंचावरून बाहेर आले. यावेळी उपस्थित मित्र आणि कुटुंबीयांनी नवविवाहित जोडप्याचे फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. या खास सोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र, कुटुंबीय तसेच क्रिकेट विश्वातील काही सहकारी खेळाडूही उपस्थित होते.
View this post on Instagram
पाच वर्षांच्या प्रेमानंतर लग्नबंधनात
कॅमेरॉन ग्रीन आणि एमिली रेडवुड गेल्या जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये यलिंगअप येथे दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता दोघांनी लग्न करत नवी सुरुवात केली आहे.
एमिली रेडवुड व्यवसायाने आहारतज्ज्ञ असून सध्या ती पीएचडीचे शिक्षण घेत आहे. कॅमेरॉन आणि एमिलीची जोडी सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
क्रिकेट विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव
कॅमेरॉन ग्रीनच्या लग्नाची बातमी समोर येताच जगभरातील क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाची पत्नी रॅशेल तसेच महिला क्रिकेटपटू अलाना किंग यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत कॅमेरॉन आणि एमिलीच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बांगलादेशविरुद्ध गाजली होती ग्रीनची फलंदाजी
दरम्यान, कॅमेरॉन ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी केली असून, आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याला २५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
कॅमेरॉन ग्रीनने गेल्याच महिन्यात आपल्या दमदार फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने संयमी आणि झुंजार फलंदाजी करत १९२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
डार्विनच्या मैदानावर कसोटी शतक झळकावणारा ग्रीन हा केवळ तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याच्याआधी २००३ मध्ये दिग्गज स्टीव्ह वॉ यांनी नाबाद १००, तर डॅरेन लेहमन यांनी ११० धावांची खेळी करत याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध कसोटी शतके झळकावली होती. आता क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.





