जिओ-एअरटेलला टक्कर देणार मस्क यांची ‘स्टारलिंक’ कंपनी, भारतात सुरू करणार इंटरनेट सेवा, किती असेल किंमत?

Starlink | अब्जाधीश इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतात प्रवेश करणार आहे. आता टेस्लापाठोपाठ मस्क यांची इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी स्टारलिंकही भारतात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. सध्या स्टारलिंकची सेवा जगभरातील जवळपास 100 पेक्षा अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, भारतात अद्याप ही सेवा उपलब्ध नाही.
रिपोर्टनुसार, स्टारलिंकला लवकरच भारतीय अंतराळ नियामकांकडून मंजुरी मिळू शकते. कंपनी सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संबंधित तरतुदींचे पालन करण्यास कंपनीने तयारी दर्शवली आहे. तसेच, सुरक्षेशी संबंधित काही आवश्यकतांवर चर्चा सुरू आहे.
कंपनीकडून आवश्यक माहिती व कागदपत्रं जमा करण्यात आली आहेत. कंपनीला परवानगी मिळाल्यास ही भारतात सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी पहिली कंपनी असेल. कंपनी भारतात आपले नेटवर्क नियंत्रण आणि निरीक्षण केंद्र स्थापन करण्यासही सहमत झाली आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे. MWC 2025 मध्ये बोलताना ते म्हणाले की, आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की सेटेलाइट कम्यूनिकेशन आणि क्षमता हा भारताच्या पोर्टफोलिओचा एक भाग आहे, जो आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना प्रदान करू. या टप्प्यावर आम्ही दोन परवाने दिले आहेत. पण इतर कंपनी भारतीय बाजारात यायला इच्छुक असेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत.’
स्टारलिंक काय आहे?
स्टारलिंक ही एक सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा टेक्नोलॉजी आहे. याच्या मदतीने कोणत्याही तार किंवा टॉवरशिवाय लोकांपर्यंत सहज इंटरनेट पोहोचवले जाते. यामध्ये इंटरनेट प्रदान करण्यासाठी सॅटेलाइट-आधारित रेडिओ सिग्नलचा वापर केला जातो.
भारतात या इंटरनेट सेवेसाठी किती शुल्क आकारले जाईल, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, भारतात याची किंमत जवळपास 7 हजार रुपये असू शकते. स्टारलिंककडून व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी वेगवेगळे प्लान उपलब्ध केले जाऊ शकतात.





