‘या’ IPO वर पैसे लावण्यासाठी तुटून पडले गुंतवणुकदार, एका तासातच ओव्हर सबस्क्राइब

Standard Glass Lining IPO : स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे. हा या वर्षातील पहिलाच आयपीओ आहे. मात्र, आयपीओ उघडताच गुंतवणुकदार यावर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या 20 मिनिटातच हा आयपीओ ओव्हर सबस्क्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी गुंतवणुकदारांकडून 2.08 कोटी शेअर्सच्या तुलनेत 26.4 कोटींपेक्षा अधिक शेअर्ससाठी अर्ज केला आहे. पहिल्याच दिवशी हा आयपीओ 12.4 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
किरकोळ आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणुकादारांकडून स्टँडर्ड ग्लास लाइनिंगच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 410.05 कोटी रुपये उभारणार आहेत. गुंतवणुकदार आयपीओ शेअर्ससाठी 8 जानेवारीपर्यंत बोली लावू शकतात. 13 जानेवारीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट होईल. ग्रे मार्केटमध्ये देखील कंपनीचे शेअर्स 70 टक्के प्रीमियमवर ट्रेड करत आहे.
रिटेल श्रेणीसाठी 1.05 कोटी शेअर्स निर्धारित करण्यात आले होते. मात्र, 14 कोटींपेक्षा अधिक शेअर्ससाठी बोली लावण्यात आली. बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी (एनआयआय) निर्धारित शेअर्सच्या तुलनेत 23.69 पट अधिक बोली लागली.
आयपीओची प्राइस बँड 133 ते 140 रुपये प्रति शेअर आहे. फ्रेश इश्यूच्या माध्यमातून उभारलेल्या पैशांचा कंपनी कर्ज फेडण्यासाठी वापर करणार आहे. तर काही पैसे इतर कंपनीच्या वाढीसाठी गुंतवले जातील. ग्रे मार्केटमध्ये देखील या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणुकदारांना प्रचंड फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





