“पैशासाठी दिव्यांगांवरील विनोद सहन करणार नाही…”; सर्वोच्च न्यायालयाचे ‘त्या’ स्टँड-अप कॉमेडियन्सना निर्देश

Stand Up Comedians। दिव्यांग आणि गंभीर शारीरिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांची खिल्ली उडवणाऱ्या व्हिडिओ प्रकरणात विनोदी कलाकार समय रैनासह पाच जणांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाने या लोकांना त्यांच्या यूट्यूब चॅनेल आणि इतर प्लॅटफॉर्मवर माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात असे विनोद टाळण्याचेही आदेश दिले आहेत. त्यासोबतच न्यायालयाने त्यांच्या कार्यक्रमांद्वारे इतरांनाही असे करू नये याची जाणीव करून द्यावी असेही म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या पाच जणांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, उपस्थित राहिलेल्यांमध्ये समय रैना, विपुन गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. सुनावणीदरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने,”ते अशा कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. त्यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता विनोदी कार्यक्रम सादर केला पाहिजे याची काळजी घेतली जाईल” असे म्हटले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, “क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही संस्था स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफीच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करते. याचिकेत अपंगांची खिल्ली उडवण्यावर किंवा त्यांच्यावर विनोद करण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका इंडियाज गॉट टॅलेंट शो वादाशी जोडली. ज्यामध्ये युट्यूबर रणवीर इलाहाबादियावरही शोवर अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्राच्या वतीने अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी, “सरकार विनोदी कलाकार आणि प्रभावकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल, ज्यामध्ये त्यांना एका मर्यादेत विनोद करावा लागेल”. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, “केवळ या प्रकरणाच्या आधारे मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाऊ नयेत, तर ती सर्वसमावेशकपणे तयार केली पाहिजेत आणि यावर तज्ञांचे मत देखील घेतले पाहिजे”. Stand Up Comedians।





