Ranveer Allahbadia – आपल्या वादग्रस्त अश्लील कॉमेंटमुळे वादात सापडलेला यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याचा पासपोर्ट परत देण्याचे आदेश दिले आहेत.
तर दुसरीकडे रणवीर अलाहाबादियाचा सहकारी समय रैना मात्र अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. प्रसिद्ध यूट्युबर रणवीर अलाहाबादिया स्टॅंड अप कॉमेडिअन समय रैनाच्या कार्यक्रमात गेला होता.
तिथे त्याने आईवडिलांच्या नात्यावर एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर तो चांगलाच अडचणीत सापडला. त्याच्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वेगवेगळ्या राज्यात आपल्याविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते एकत्र करण्यात यावेत, अशी मागणी रणवीरने यात केली होती.
मध्यंतरी त्याला न्यायालयाकडून त्याचा नेहमीचा पॉडकास्ट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. पण तेव्हाच न्यायालयाने त्याच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यातूनही दिलासा देत सोमवारी न्यायालयाने त्याचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत.