लिबेरिया येथे चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू

मोन्रोव्हिया – लिबेरियाची राजधानी मोन्रोव्हियामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 मुलांसह एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. न्यू क्रू टाऊन परिसरातील एका चर्चमध्ये रात्रीच्या वेळी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लिबेरियाची राजधानी मोन्रोव्हियामध्ये रात्रीच्या वेळी एका चर्चमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शेकडो नागरिक एकत्र जमले होते. त्याच वेळी गर्दीच्या दिशेने काही दरोडेखोर शस्त्रं घेऊन येताना दिसले. हे दरोडेखोर शस्त्रांचा वापर करून आपल्याला जखमी करतील, या भीतीने नागरिकांची धांदल उडाली. यामुळे एकच धावपळ सुरू झाल्याने अनेक नागरिक चेंगरले गेले.
या चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील अनेकांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


