Monsoon Update: दिलासादायक! रखडलेला मान्सून सक्रिय होणार; 8 दिवस राज्यात धो-धो पावसाची शक्यता
Monsoon Update: देशभरात सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के पावसाची तूट

Monsoon Update: राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतिक्षा आहे. पाऊस न पडल्याने अनेक जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच पेरणीचा हंगाम आल्याने शेतकऱ्याचे डोळेही आभाळाकडे लागले आहे. परंतु आता बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
राज्यात लवकरच पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवर २४ जूनपासून पावसाचा जोर वाढू शकतो. २६ आणि २७ जूनच्या सुमारास तो उत्तर कोकणात पोहोचेल, असा अंदाज आहे. मुंबईत यंदा मान्सूनच्या विलंबाने आगमनाचा नवा विक्रम नोंदवला जाऊ शकतो, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.
नैऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला असून ४ ते १८ जून या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिली.
मात्र काही दिवसांपासून रखडलेली मान्सूनची वाटचाल पुढील आठवड्यात साधारण २४ ते २५ जूनपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
राज्यात जोरदार पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाचवेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावेल.
पावसाची विदर्भातून सुरूवात होऊन, त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापण्याची शक्यता आहे. 21 जून ते 30 जून हे आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, शेतातील ओल चांगली नसेल तर पेरणी करू नये, असं आवाहनही पंजाबराव डख यांनी केलं आहे. Monsoon Update
हेही वाचा:






