Smart Meter Controversy: स्मार्ट मीटर बसविण्याचे कारणच काय? महावितरणच्या ‘या’ उत्तरामुळे पुणेकरांमध्ये संताप
Smart Meter Controversy: पुणे आणि परिसरात स्मार्ट मीटर सक्तीवरून वीजग्राहकांमध्ये तीव्र असंतोष; अधिकृत पत्र न देताच मीटर बदलत असल्याचा आरोप.

Smart Meter Controversy – स्मार्ट मीटर कायद्याने बंधनकारक आहे का? याचे स्पष्ट उत्तर महावितरणकडे नाही. वीज मीटर चालू असताना ते बदलण्याचं कारण काय? महावितरणचं कोणतंही अधिकृत स्पष्ट पत्र ग्राहकांच्या हाती का दिले जात नाही? अशा अनेक प्रश्नांमुळे पुणे आणि परिसरातील वीजग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बदलण्याच्या मोहिमेमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, यात नेमका कोणाचा फायदा होणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया वीज ग्राहकांतून उमटत आहे.
नवीन सिटी (स्मार्ट) मीटरचा मोठा फटका पुणे परिसरातील छोटे उद्योजक, व्यावसायिक आस्थापना आणि सौर ऊर्जा वापरणाऱ्यांना बसत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढल्याच्या तक्रारी येत असून, लघुउद्योगांसह सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. ग्राहकांना थेट मीटर बदलण्याची सक्ती केली जात आहे. चांगल्या स्थितीत असलेले मीटर काढून कोट्यवधी रुपयांचा खर्च ग्राहकांच्या माथी मारण्याचा हा घाट असल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. सक्ती नसली तरी सरसकट सर्वच ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असल्याने, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
महावितरणने सर्व आरोपांचे खंडन…
महावितरणने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले असून ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरात १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. पुणे परिमंडलात वीज ग्राहकांची संख्या सुमारे ३९ लाख असून, त्यापैकी आतापर्यंत १४ लाख ७२ हजार वीजग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मीटर बसवूनही कुठेही तक्रारी नाहीत, त्यामुळे विनाकारण गैरसमज करून घेऊ नये, असे महावितरणने म्हटले आहे.
स्मार्ट मीटरची सक्ती नाही : महावितरण
महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची कोणतीही सक्ती केली जात नाही. आम्ही ग्राहकांना केवळ आवाहन करत आहोत. केवळ बिलिंगच नव्हे, तर तासाला किती वीज वापरली, याचीही अचूक माहिती ग्राहकांना मिळणार आहे. दिवसा वीज वापरल्यास ग्राहकांना सवलतही मिळेल. ही सुविधा पूर्वीप्रमाणेच पोस्ट-प्रिपेड असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या आधुनिक सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केले.
सक्तीच्या विरोधात आंदोलन…
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात पतित पावन संघटनेच्या वतीने रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर लादल्या जाणाऱ्या या स्मार्ट मीटर प्रणालीस आमचा तीव्र विरोध असून, बळजबरीने मीटर बसवून ग्राहकांना त्रास देऊ नये, अशी मागणी संघटनेचे राजाभाऊ पाटील, श्रीकांत शिळीमकर, ललित खंडाळे आणि गोकुळ शेलार आदींनी केली आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करून या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे.





